म. टा. वृत्तसेवा कल्याण विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ ग्रामीण भागातील ६३ गावच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रमेश म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही तर भोईर यांचे काम न करता त्यांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेत आलेल्या भोईर यांनाच पुन्हा शिवसेनेने कल्याण ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे ग्रामीण भागातील शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. या भागात मागील पाच वर्षांत कोणतेही काम न करता खासदार शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुभाष भोईर यांनी केला आहे. स्वातंत्र्याला ७२ वर्षे उलटली मात्र तरीही १४ गावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी नाही. आमदार म्हणून या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे कोणतेही प्रयत्न त्यांनी केलेले नसून कोणत्याही शिवसैनिकांना भोईर विश्वासात घेत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. वाकळण गावचे सरपंच अनिल भोईर, कल्याण ग्रामीणचे तालुकाप्रमुख एकनाथ पाटील यांच्यासह रमेश म्हात्रे यांच्या शेकडो समर्थक स्थानिक शिवसैनिकांनी भोईर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट