Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 44332 articles
Browse latest View live

बलात्कार करणाऱ्याला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार करून पळून गेलेल्या गुन्हेगाराला अखेर महात्मा फुले पोलिसांनी अटक केली. केवळ आडनावाच्या आधारावर कल्याण पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील तिसगावात शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.

चार महिन्यांपूर्वी कल्याण स्थानक परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलगी पोलिसांना सापडली. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या मुलीला रुग्णालयात दाखल केले. ती फक्त आपले नाव आणि आडनाव सांगत होती. ही मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी नाव, आडनाव आणि जिल्हा जळगाव या तीन शब्दांच्या आधारावर आपला तपास सुरू केला. जी तीन आडनावे मुलगी घेत होती, त्या आडनावाची मुले जळगावच्या तिसगावात राहत असल्याची माहिती मिळाली. या गावात तपास केला असता गुन्हेगार शांताराम हटकर पोलिसांच्या हाती लागला. शांताराम मुलीचा नातेवाईक असून त्याच्या कृत्याने एकच खळबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पालघर

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात नालासोपारा येथील रहिवासी असलेल्या गणेश भोर नामक व्यक्तीने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यात रिक्षाचालक असणारे गणेश भोर जबर भाजले असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.

या घटनेत गणेश ७० ते ७५ टक्के भाजले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या केबिनमध्ये हा प्रकार घडला आहे. गणेश दामू भोर यांची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांनी हा प्रकार केला असल्याचे समजते. ही व्यक्ती नालासोपारा सेंट्रल पार्क येथील रहिवासी आहे. गणेश भोर यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडून फ्लॅट विकत घेतला होता. त्या मोबदल्यात त्याने आठ लाख रुपये त्याला दिले होते. मात्र बिल्डरने सदनिकेचा ताबा न देता ही सदनिका परस्पर दुसऱ्याला विकली. या प्रकरणी गणेश दामू भोर यांनी अनेक वेळा पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. नालासोपारा पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. याबाबत गणेश भोर यांनी न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी प्रयत्न केला होता. न्यायालयाने ही रक्कम त्याला देण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे सहा लाख रुपये बांधकाम व्यावसायिकाला गणेश यांना डिमांड ड्राफ्टने दिले. मात्र उर्वरित दोन लाख अजूनही मिळत नसल्याने गणेश हताश झाले होते. त्यांनी वारंवार पोलिस ठाण्याच्या चकरा मारूनही त्यांना हे पैसे मिळाले नाहीत. पैसे न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करावी, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अनेक पत्रे पाठवली होती. तसेच, मला पैसे न मिळाल्यास तसेच बिल्डरवर कारवाई न केल्यास कार्यालयातच आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या शेवटच्या पत्रात इशारा दिला आहे.

गणेश भोर यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही पत्र घेण्यासाठी ते आले होते, मात्र कागदपत्रांच्या मूळ प्रती अपेक्षित असल्याने त्यांच्याकडे तशी मागणी करण्यात आली. यानंतर त्यांनी पत्नीला फोन करून ही मूळ कागदपत्रे मागवली, परंतु त्यानंतरही त्याची पुरेशी दाखल घेण्यात न आल्याने त्यांनी स्वत:सोबत आणलेले ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी अर्ज दाखल

$
0
0

राज्यभर 'अर्जधुमाळी'

दिग्गजांनी गाठला गुरुवारचाच मुहूर्त; अर्जासाठी आज शेवटचा दिवस

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या, शुक्रवार शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांतील बऱ्याचशा उमेदवारांनी गुरुवारीच अर्जाचा मुहूर्त साधला. त्यामुळे राज्यभरातील निवडणूक कार्यालयांमध्ये 'अर्जधुमाळी'चे वातावरण होते.

मुंबईत शिवसेनेचे अदित्य ठाकरे यांच्यासह, भाजपचे मंगलप्रभात लोढा, काँग्रेसचे नसिम खान, अमिन पटेल यांनी, तर 'राष्ट्रवादी'च्या नवाब मलिकांसह काही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अर्ज दाखल केला. राज्यभरात पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, बबनराव लोणीकर, सुरेश खाडे, जयकुमार रावल, विजयकुमार गावित, डॉ. संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, अशोक उईके, मदन येरावार, बाळा भेगडे, रवींद्र चव्हाण आदी मंत्र्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मराठवाड्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतून माजी मंत्री नसीम खान यांनी चांदिवली मतदारसंघातून, तर अमीन पटेल यांनी मुंबादेवी मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

..............

आदित्य ठाकरे रिंगणात

शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. 'मी केवळ वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करेन. मी जिंकणार असा मला विश्वास आहे, कारण तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत,' असे आदित्य यांनी अर्ज भरल्यानंतर सांगितले. काही महिन्यांपासून आदित्य यांच्या रूपाने ठाकरे घराणीतील व्यक्ती प्रथमच निवडणूक लढविणार की नाही याविषयी उलट सुलट चर्चा सुरू होती. मात्र, आदित्य यांनी स्वत:च त्यांची वरळीमधून उमेदवारी जाहीर केली. गुरुवारी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. या वेळी सोबत त्यांचे वडील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी आणि बंधू तेजस उपस्थित होते. अर्ज भरण्याआधी आदित्य यांनी सर्वप्रथम आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.

................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कुख्यात गुंडांवर कारवाई

$
0
0

ठाणे : विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरू केला असून शहरातील दोन कुख्यात गुंडांपैकी एकाला स्थानबद्ध, तर दुसऱ्याला तडीपार करण्यात आले आहे. सिद्धेश बाळा म्हस्कर उर्फ सिद्धेश उर्फ सिद्धु अभंगे (२७) आणि सौरभ वर्तक (३२) अशी या गुंडांची नावे आहेत.

अभंगे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, दंगल घडवणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याला दोन वर्षांसाठी स्थानबद्ध करण्याच्या प्रस्तावाला पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मंजुरी दिली. या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत पोलिसांनी सुरुवात केली होती. त्याआधीच अभंगे गायब झाला. अंबरनाथ, बदलापूर, कळवा, कल्याण, पुणे, सोलापूर, हैदराबाद आदी वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्य करत होता. वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत असल्याने त्याला पकडणे अवघड झाले होते, परंतु कोपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. ए. आगरकर, पोलिस निरीक्षक डी. गावडे यांच्या पथकाने गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सिद्धूला चिपळूण रेल्वे स्थानकात पकडले. अभंगे याला स्थानबद्ध करण्यात आले असून नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आले. सौरभ वर्तक याच्याविरुद्धही खंडणी, दंगलीचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याचीही मोठी दहशत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगडमधून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाळणाघर योजना कागदावरच

$
0
0

नऊ महिने उलटले तरी लाभार्थी मिळेना

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

पाळणाघराची सुरक्षा ऐरणीवर आल्यानंतर राज्यातील राजीव गांधी पाळणाघर योजनेअंतर्गत असलेल्या पाळणाघरांची मान्यताच जानेवारीमध्ये रद्द करण्यात आली आहे. तर नव्याने जानेवारीपासून महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा पाळणा नऊ महिने उलटले तरी अद्याप हललाच नाही. या योजनेला लाभार्थीच नसल्यामुळे गेल्या नऊ महिन्यांत ठाणे जिल्ह्यात ही योजना सुरू झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता ठाण्यात अस्तित्वात असलेल्या पाळणाघरांची नोंद कुठेच नसल्याचेही यावरून स्पष्ट होत आहे.

केंद्र सरकारने समाजकल्याण विभागाच्या वतीने राजीव गांधी पाळणाघर योजना राज्यभर राबविली, मात्र राज्यातील १६७० पाळणघरांची नोंद असलेल्या यादीतील ८७० पाळणाघरे बोगस असल्याचे आढळून आले. केवळ सरकारकडून मिळणारे १ लाख ३६ हजारांचे अनुदान लाटण्यासाठी अनेक पाळणाघरे या योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. जी ८०० पाळणाघरे सुरू होती, त्यामध्येही अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले. दोन वर्षांपूर्वीच बोगस प्रकार आढळून आल्यानंतर पाळणाघरे बंद करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

ही पाळणाघर योजना समाज कल्याण बोर्डाच्या वतीने न राबविता राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व मान्यता स्थगित ठेवलेल्या सर्वच पाळणाघरांची मान्यता रद्द करण्यात आली. राष्ट्रीय पाळणाघर योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत खासगीरित्या चालविण्याबाबत १० जानेवारी २०१९पासून मान्यता देण्यात आली. नऊ महिने उलटले तरी या योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातून एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही. त्यामुळे अद्याप या योजनेला मुहूर्तच मिळालेला नाही. महापालिका आणि जिल्हा परिषद क्षेत्रातील इच्छुकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेत कोणतेच अनुदान मिळत नसल्यामुळे त्याकडे पाठ फिरविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहतूकदारांचा संप

$
0
0

हजारो ट्रक रस्त्यावर न उतरल्यामुळे माल गोदामातच पडून

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघ आणि जेएनपीटी वाहतूकदार बचाव समन्वय समितीच्या वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेला संप पूर्णपणे यशस्वी ठरला आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि रायगडमधील जवळपास २६ हजार ट्रक-ट्रेलर गुरुवारी रस्त्यांवर उतरले नाहीत. रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करून या वाहतूकदारांनी निषेध व्यक्त केला.

जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या आणि ठाणे, नवी मुंबई, रायगडकडे येणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी वाढली असून या वाहतूककोंडीत अडकून वेळ आणि इंधन यांचाही अपव्यय होत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकदार मेटाकुटीला आले आहेत. यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. तसेच, मालवाहू वाहनांना मुख्य मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या येणाऱ्या वाहनांना थांबण्यासाठी वाहन पार्किंगचीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागत आहेत. मात्र अशा थांबणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होत असल्याने वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या दररोजच्या समस्यांना कंटाळून नवी मुंबई व रायगडमधील वाहतूक संघटनांनी एकत्रित येत ते बेमुदत संपावर गेले आहेत. वाहनांवर कारवाई करताना ई-चलानमध्ये पारदर्शकता आणून त्यानंतरच कारवाई करण्यात यावी, न्हावा-शेवा पोर्ट परिसरातील सीएफएस व एमटी कंटेनर यार्ड यांच्याकडे स्वत:ची पार्किंग नसल्याने होणारी कारवाई वाहतूकदारांवर न करता संबंधितांवर करावी. संबंधित यार्डला पार्किंग उपलब्ध करून देण्याची ताकीद देण्यात यावी. जेएनपीटी प्रशासनाने त्यांच्या परिसरामध्ये वाहनांस विनाशुल्क पार्किंगसाठी प्लॉट उपलब्ध करून वाहनतळ निर्माण करावेत, अशा प्रमुख मागण्यांसाठी नवी मुंबई आणि रायगडमधील मालवाहतूकदारांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे गुरुवारी या मार्गावर वाहने उभी असल्याचे पहायला मिळत होते.

या संपाचा सर्वात जास्त फटका नवी मुंबई आणि रायगडमधील लघुउद्योगांना बसणार आहे. वाहतूकदारांच्या संपामुळे तयार झालेला पक्का माल, कच्चा माल उद्योजकांपर्यंत पोहचवता येत नसून त्यामुळे लाखोंचे नुकसान होणार आहे. जेएनपीटी आणि तळोजा एमआयडीसी परीसरातील कंपन्यांना याचा फटका बसला आहे. आशियातील एकूण समुद्री मालवाहतुकीच्या जवळपास ४० टक्के वाहतूक या बंदरातून होते. मात्र गुरुवारच्या मालवाहतूकदारांच्या संपामुळे कंपन्यांचा माल तसाच गोदामात पडून आहे. मालवाहतूक कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या हमालांचीही त्यामुळे उपासमार सुरू झाली आहे. माल वाहतूकदारांच्या समस्या सरकारने लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर संपाचे रूपांतर आंदोलनात करू, असा इशारादेखील महाराष्ट्र मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी दिला आहे. या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची संख्या आठ हजार ते दहा हजार इतकी आहे. ही सर्व वाहतूक ठप्प असल्याने जेएनपीटी प्रशासनासह कामकाज पूर्णपणे ठप्प आहे.

जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही हा बेमुदत संप सुरूच ठेऊ. प्रशासनाने या विषयावर चर्चा करावी आणि योग्य तो तोडगा काढावा आणि ही समस्या संपुष्टात आणावी, अशी आमची मागणी आहे.

भरत पोखरकर, महाराष्ट्र मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थानकात प्रवाशाला लुटले

$
0
0

नवी मुंबई : लोकलची वाट पहात रेल्वे स्थानकात बाकड्यावर झोपी गेलेल्या तरुणाच्या खिशातील मोबाइल फोनसह सोन्याचे ब्रेसलेट आणि रोख रक्कम असा सुमारे पाऊण लाख रुपये किमतीचा ऐवज दोघा लुटारूंनी लुटून नेल्याची घटना बुधवारी पहाटे सानपाडा रेल्वे स्थानकात घडली. वाशी रेल्वे पोलिसांनी या लुटारूवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

विपुल विजयसिंग (२५) घणसोली गावातील चिंचाळी भागात राहतो. विपुल मंगळवारी कामानिमित्त पुणे येथे गेला होता. त्यानंतर तो बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास सानपाडा येथे बसने उतरला होता. त्यानंतर घणसोली येथे जाण्यासाठी विपुल सानपाडा रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहात बसला. मात्र यावेळी त्याला झोप आल्याने तो तेथील बाकड्यावर झोपी गेला. हीच संधी साधून दोघा चोरांनी विपुलच्या खिशातील २० हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन तसेच ६० हजार रुपये किमतीची सोन्याची ब्रेसलेट त्याचप्रमाणे चार हजार ५०० रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. यावेळी विपुलला जाग आल्यानंतर त्याने आरडाओरड करत त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दोघा लुटारूंनी पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणे जिल्ह्यातही कल्लोळ

$
0
0

ठाणे : नवी मुंबईत भाजपला मतदारसंघ सोडल्यामुळे निर्माण झालेली शिवसैनिकांमधील नाराजी कायम असून बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. विजय नाहटा हे ऐरोलीत गणेश नाईकांना आव्हान देण्याची शक्यता आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे पुत्र, विद्यमान आमदार अमित घोडा हे शिवसेनेतून निवडून आले होते. मात्र शिवसेनेने त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरतील.

कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेकडून आमदार सुभाष भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रमेश म्हात्रे यांची शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबियांनी विधानसभा उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या वाटेवर मार्गक्रमणा सुरू केल्याचे बोलले जाते. कल्याण पश्चिमेतून आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला असला तरी अद्याप अर्ज भरलेला नाही. शुक्रवारी पवार अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवी मुंबईत युतीधर्माला हरताळ

$
0
0

भाजप उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेची बंडखोरी

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यापासून नवी मुंबईत दररोज राजकीय भूकंपांना सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईकांच्या उमेदवारीला भाजपने डच्चू दिला. त्याची तीव्रता कमी करण्यासाठी अखेर संदीप नाईक यांनी ऐरोलीतून माघार घेत आपले वडील गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपला भाग पाडले. बेलापूर व ऐरोली हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे खेचत भाजपने यापूर्वीच शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविला. त्यामुळे व्यथित झालेल्या शिवसेनेच्या नवी मुंबईतील नेत्यांनी भाजप उमेदवारांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे.

बेलापूरमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी मंदा म्हात्रे यांच्याविरोधात बंड करून गुरुवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. ऐरोलीत गणेश नाईक यांच्याविरोधात शिवसेनेचे उपनेते असलेले विजय नाहटा यांनी बंडाचे निशाण फडकावले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे विजय नाहटा यांनी ऐरोलीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यास ऐरोलीची निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे बेलापूरपेक्षा ऐरोली मतदारसंघात शिवसेनेचे चांगलेच प्राबल्य आहे. ऐरोली मतदारसंघात शिवसेनेचे २६ नगरसेवक आहेत. तर नाईक समर्थक २५ नगरसेवक आहेत. तसेच भाजप दोन, काँग्रेस तीन, अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे येथे गणेश नाईक विरुद्ध विजय नाहटा यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी मुंबईत काँग्रेसला गळती

$
0
0

काँग्रेसच्या पाच पदाधिकाऱ्यांनी केला भाजपप्रवेश

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील काँग्रेसच्या नेत्यांनी यापूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली असताना आता काँग्रेस पक्षाचे नगरसेवकदेखील सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत. गुरुवारी काँग्रेसच्या पाच पदाधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांच्या पत्नी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. यामध्ये नवी मुंबई काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, निशांत भगत, अंकुश सोनवणे, विजय वाळुंज व अजय वाळुंज यांचा समावेश आहे. यामुळे नवी मुंबईत काँग्रेसला भगदाड पडले.

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित केलेल्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, अनंत सुतार उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे प्रकल्पग्रस्त नेते म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे दशरथ भगत यांना काही वर्षांपासून त्यांना पक्षातून डावलण्यात येत होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्येच राहून प्रकल्पग्रस्त संघटनेच्या माध्यमातून आपले समाजकारण सुरू ठेवले होते. त्यातून त्यांनी नवी मुंबईत स्वत:चे वेगळे अस्तित्व तयार करून तीन नगरसेविका निवडून आणल्या.

दरम्यान, गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाने नवी मुंबईची राजकीय समीकरणे बदलली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होऊनही दोन्ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा निराशा आली. परिणामी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दशरथ भगत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

पाच नगरसेविकांचा भाजपप्रवेश लांबणीवर

माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्यासोबत विद्यमान काँग्रेस नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत, रुपाली निशांत भगत, अंजली वाळुंज व हेमांगी सोनवणे भाजप प्रवेश करणार होत्या, मात्र या पाच नगरसेविकांचा स्वतंत्र गट स्थापण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने तूर्तास काँग्रेसच्या या पाच नगरसेविकांचा भाजप प्रवेश रखडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेलापूरमधून १० उमेदवारी अर्ज

$
0
0

म्हात्रे, गावडे, काळे रिंगणात

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गुरुवारपर्यंत १० उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यात भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी उपमहापौर अशोक गावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तथा विद्यमान शहरप्रमुख विजय माने, अपक्ष उमेदवार भानुदास धोत्रे, अनिल घोगरे, मुकेश ठाकूर आणि हरजीत सिंग कुमार या दहा जणांनी बेलापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

अर्ज भरण्यापूर्वी म्हात्रे आणि समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. तर मनसेतर्फे गजानन काळे यांनी गुरुवारी अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी सकाळी मतदारसंघ परिसरात १५१ झाडे लावून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ काळे यांनी केला. त्यानंतर दुपारी १.३० वाजता अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूरमध्ये रॅली काढण्यात आली. रॅलीचा शेवट काळे यांनी कोकण भवन येथे नामांकन अर्ज दाखल करून केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केळवेरोड ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पालघर

पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड येथे पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्ग डीएफसीसीएलच्या पुलाच्या बांधकामासाठी बंद करण्याचा घाट सरकारने घातल्याने त्या विरोधात गुरुवारी पालघर तालुक्यातील केळवे रोड परिसर कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

धोंदलपाडा, केळवे रोड येथे ही बैठक झाली. यावेळी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केळवे रोड येथे पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा भुयारी मार्ग डीएफसीसीएल पुलाच्या बांधकामासाठी बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून हा रस्ता बंद झाल्यास परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पूर्वेकडील नागरिकांना पश्चिमेकडे बाजार, शाळा व रुग्णालयात जाण्यासाठी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध राहणार नाही. अस्तित्वातील रस्तासुद्धा थोड्याशा पावसाने बंद होतो. पूर आल्यास पूर्व विभागाचा संपर्क तुटतो. रुग्ण, महिला, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांचे अतोनात हाल होतात. पूर्व विभागात किमान २५ आदिवासी पाडे आहेत. तेथील आदिवासी बांधव उपजीविकेसाठी या रस्त्यावर अवलंबून आहेत. ही गावेही पेसा कायद्यांतर्गत येतात.

केळवे रोड पूर्व येथे पालघर तालुक्यातील सर्वात मोठा बंधारा असून या बंधाऱ्याचे पाणी २७ गावांना पुरविले जाते. या बंधाऱ्याच्या डागडुजीकरिता तसेच पूरपस्थितीमध्ये काही दुर्घटना झाल्यास बाहेर पडण्यासाठी हाच रस्ता आहे. राज्य सरककारतर्फे मंजूर झालेल्या प्रादेशिक योजनेमध्ये केळवे रोड हे विकासकेंद्र म्हणून घोषित करण्यात आले असून, त्या नकाशांमध्येसुद्धा या विभागासाठी कुठलीही तरतूद केलेली नाही. सफाळे उड्डाणपूल ते पालघर उड्डाणपूल या १३.५० किमी अंतरामध्ये केळवे रोड हे एक उपनगरीय स्टेशन असूनसुद्धा एकही उड्डाणपूल उपलब्ध नाही.

पूर्व भागामध्ये वापरात असलेला एकमेव रस्तासुद्धा २००३मध्ये तयार केला आहे. त्याची सद्यस्थिती अतिशय वाईट आहे. गेल्या १७ वर्षांमध्ये त्याची एकदाही डागडुजी झालेली नाही. या सर्व बाबींचा विचार करता केळवे रोड पूर्व-पश्चिम भाग जोडण्यासाठी उड्डाणपूल हाच पर्याय असून महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच जर सरकार या मागण्यांकडे लक्ष देणार नसेल तर येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इलेक्ट्रिक बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

पर्यावरणपूरक अशा १५ इलेक्ट्रिक बस सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. उरलेल्या १५ बसही लवकरच दाखल होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात ही बससेवा सुरू करण्यात येणार होती. मात्र प्रत्यक्षात काही कारणांमुळे ती सुरू झालेली नाही. मात्र २ ऑक्टोबर या गांधी जयंतीचा मुहूर्त साधत घणसोली ते वाशी रेल्वे स्थानक या मार्गावर ही बससेवा सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. वातानुकूलित असलेल्या या बससाठी सध्या साध्या बसचेच तिकीटदर आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांची या बसला पसंती मिळत आहे.

सध्या आलेल्या इलेक्ट्रिक बसमधून ही एकच बस रस्त्यावर उतरवण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक बस असल्याने चार्जिंग केल्यावर ती किती किलोमीटर प्रत्यक्षात धावणार आहे या आणि इतर बाबी तपासून पाहण्यासाठी सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही बससेवा सुरू केली असल्याचे वाहक आणि चालकांनी सांगितले. सध्या ही एकच बस दिवसातून नऊ फेऱ्या मारणार आहे. घणसोली ते घरोंदा या मार्गावर नेहमी प्रवाशांची गर्दी असते. येथून वाशी रेल्वे स्थानकापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सध्या या मार्गावर ही बससेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे. यावरून बसची पूर्ण तपासणी करून त्यावरून बसचे पुढचे नवीन मार्ग ठरवले जाणार आहेत. या मार्गावरील बसच्या नफा-तोट्यावर पुढचे गणित अवलंबून असणार आहे. सध्या या बसमध्ये ३२ प्रवासी बसून आणि १० प्रवासी उभ्याने प्रवास करू शकत आहेत. या बसखरेदीसाठी सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळाले आहे आणि ४० टक्के खर्च पालिका परिवहन उपक्रमाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भास्कर खतगावकर काँग्रेसमध्ये परतण्याची चिन्हे

$
0
0

आज स्पष्ट करणार भूमिका

नांदेड : प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर हे श्रेष्ठींवर नाराज असून ते पुन्हा काँग्रेसमध्ये स्वगृही परतण्याची चिन्हे आहेत. या बाबतचा निर्णय शुक्रवारी होणार असून काँग्रेस नेत्यांनी त्यांचे मन वळवण्यचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सुमारे पाच वर्षांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांनी भाजपमध्ये विनाअट प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे जावई असलेल्या खतगावकरांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या पाच वर्षांत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांना भाजपमध्ये घेवून कमळ फुलवण्याचे काम त्यांनी केले. वर्ष भरातच त्यांना प्रदेश उपाध्यक्षपद मिळाले. परंतु त्यानंतर सूर्यकांता पाटील, डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यासह खतगावकरांचीही पक्षाने उपेक्षाच केली.

नायगांव मतदारसंघातून खतगावकर यांनी त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चीबांधणी केली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते उमेदवारीची तयारी करत होते. भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना याबाबत आश्‍वस्त केले होते. उमेदवारी मिळेल या आशेवर असलेल्या खतगावकर यांना बुधवारी जबरदस्त धक्का बसला. भाजपने राजेश पवार यांना संधी दिली. पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गुरुवारी खतगावकरांचे हजारो समर्थक राजेंद्र नगरात दाखल झाले. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर खतगावकरांनी चिंतन करून शुक्रवारी आपला निर्णय सांगतो, असे सांगून समर्थकांची समजूत काढली.

खतगावकर नाराज असल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना स्वगृहीत परतण्यातबाबत साकडे घातले. मीनल खतगावकर यांना मुखेड किंवा नांदेड दक्षिणमधून उमेदवारी देण्यात येईल. तसेच त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, असे स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे काही खास दूत खतगावकरांना भेटले त्यांच्यामध्ये चर्चा झाली. चर्चेचा पूर्ण तपशील बाहेर पडला नसला तरी खतगावकर स्वगृही परतण्याबाबत सकारात्मक असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, खतगावकर मात्र चिंतन करून शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

भाजपसाठी मोठा धक्का

खतगावकर काँग्रेसमध्ये गेले तर तो भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे. खतगावकरांच्या स्वगृही परतण्यामुळे काँग्रेस पक्षाला नायगांव, मुखेड, देगलूर तसेच नांदेड दक्षिण मतदारसंघात मोठा फायदा होणार आहे. या मतदारसंघात खतगावकर समर्थकांची संख्या लक्षणीय आहे.

चिखलीकरांचे बंड झाले थंड

कंधार विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानतर नाराज झालेले खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी बुधवारी सुपूत्रासह मुख्यमंत्र्याची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांचे बंड थंड झाल्याचे मानले जाते. चिखलीकर स्वतः भोकर मतदारसंघ गोरठेकरांच्या प्रचारासाठी नांदेडहून सकाळीच रवाना झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे पूत्र बंड करणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी दाखल करताना मुंडे बंधू-भगिनीचे शक्तिप्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

परळी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

गुरुवारी सकाळी धनंजय मुंडे यांनी परळी येथे प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर जन्मगाव नाथरा येथे ग्रामदैवताचे दर्शन व गावातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथगड येथील समाथीस्थळी तसेच वडील स्व. पंडीतअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जावून त्यांनी दर्शन घेतले. मातोश्री रूक्मीणबाई मुंडे व कुटुंबियांनीही त्यांचे औक्षण करून शुभेच्छा व आशीर्वाद दिले. त्यानंतर त्यांनी तहसिल कार्यालयात जावून उमेदवारी अर्जाचे चार संच दाखल केले. अर्ज दाखल करताना त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी विजयी संकल्प रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. वैद्यनाथ मंदिर आणि त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरवात झाली. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात आली व याठिकाणी रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या रॅलीत राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशःश्री मुंडे, केशवराव आंधळे, वसंतराव नाईक महामंडळाचे उपाध्यक्ष देविदास राठोड, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, फुलचंद कराड यावेळी उपस्थित होते.

बीड जिल्ह्यात ६४ उमेदवारांचे अर्ज दाखल

बीड : बीड जिल्ह्यात गुरुवारी सहा विधानसभा मतदारसंघांत ६४ उमेदवारांकडून एकूण ९० अर्ज दाखल करण्यात आले. गेवराई मतदारसंघातील १७ उमेदवारांची २२ नामनिर्देशन पत्रे, माजलगाव १२ उमेदवारांची १८ अर्ज, बीडमध्ये नऊ उमेदवारांचे ११ अर्ज, आष्टीमध्ये सहा उमेदवारांचे ९ अर्ज दाखल केले. केजमध्ये ५ उमेदवारांचे सात अर्ज दाखल आणि परळीत १५ उमेदवारांचे २३ अर्ज दाखल झाले. सहा विधानसभा मतदारसंघात ६४ उमेदवारांकडून एकूण ९० अर्ज दाखल करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सहा मतदारसंघात ८३ उमेदवारांची ११४ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असल्याची माहिती संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

$
0
0

दिग्गज मंडळी विधानसभेच्या रिंगणात

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यातील सर्वच मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवारांनी गुरुवारी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले. बीडमधून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, अन्न व नागरीपुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासह दिग्गज मंडळीने उमेदवारी अर्ज दाखल केले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.

जिंतुरात १३ उमेदवारांचे अर्ज

परभणी : जिंतूर-सेलू विधानसभा गुरुवारपर्यंत १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली. पाथरीचे आमदार मोहन फड यांनी गुरुवारी (३ ऑक्टोबर) महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एल. कोळी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार फड यांच्यासोबत रिपाइंचे जिल्हाध्यक्ष डॉ. गायकवाड, शिवसेनेच्या माजी आमदार मीरा रेंगे, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष विजय सीताफळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांची उपस्थिती होती.

नांदेडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड - नांदेडसह जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवारांनी गुरुवारी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर, राजश्री पाटील यांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. एक-दोन दिवसांत युती तसेच आघाडीची उमेदवारी मिळविणाऱ्या अनेकांनी गुरुवारचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले. नांदेड-उत्तर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे डी. पी. सावंत, दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या राजश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे राज्याचे लक्ष लागलेल्या भोकर मतदारसंघात भाजपच्या बापुसाहेब गोरठेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्या प्रणिता चिखलीकर यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जालन्यात ४७ उमेदवारी अर्ज दाखल

जालना : जोरदार शक्तिप्रदर्शन करून पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी परतुर तर आमदार राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. जालन्यात काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल, भोकरदनमध्ये भाजपचे आमदार संतोष दानवे, राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, बदनापूरमध्ये राष्ट्रवादीचे बबलू चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात ४७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.

परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये सरिता मारोती खंदारे (भारतीय कम्युनिष्ट पक्ष (मार्क्सवादी), बबनराव दत्तात्रय लोणीकर, राहुल बबनराव लोणीकर, अझहर युनुस शेख व सुरेशकुमार जेथलिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. घनसावंगीत आमदार राजेश टोपे, मनीषा राजेश टोपे (राष्ट्रवादी काँगेस), डॉ. अप्पासाहेब कदम (स्वतंत्र भारत पक्ष), हिकमत उढाण (शिवसेना), बाबासाहेब शिंदे (अपक्ष), हसुन मोहिद्दीन शेख (बसपा), बाळासाहेब बर्डे (अपक्ष), शिवाजी गणपत बर्डे (अपक्ष), इनायतखान अब्बास खान (अपक्ष), संतोष सुरेश मोरे (अपक्ष), वैजिनाथ प्रभाकर मुकणे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

जालना मतदारसंघामध्ये कैलास गोरंट्याल (काँग्रेस) अंकुश शितोळे, रतन लांडगे, परशुराम यादव, हंम्मद मुजाहेद अब्दुल बारीसिद्दीकी, सत्तार नसीर अहेमद शेख , जुनेद युनुस कुरेशी, हरिभाऊ रत्नपारखे (बहुजन समाज पक्ष), प्रताप हसनराव लहाने (स्वतंत्र भारत पक्ष), बबन गोविंदराव बोर्डे , अहेमद रहिम शेख , बिजलाबाई म्हस्के , सिमा खोतकर (शिवसेना) प्रभुदास वानखेडे, जालिंदर वाघमारे, द्वारकाबाई लोंढे, रुक्मिण आठवले, रेखाबाई खांडे, शे. रफीक शे. लतिफ अ (इंडियन युनियम मुस्लीम लीग), रंजित निकाळजे, जॉर्ज शिंदे (मराठवाडा मुक्ती मोर्चा) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद खेमचंद अडागळे (राष्ट्रवादी), चौधरी रुपकुमार नेहरुलाल (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) बाबु श्रावण पवार (शिवसेना) , विष्णु भागाजी इंगोले (अपक्ष), राहुल मधुकर खरात (मराठवाडा मुक्ती मोर्चा), ॲड. भास्कर बन्सी मगरे (शिवसेना), चाबुकस्वार राहुल निरंजन (अपक्ष), ज्ञानेश्वर हिरामन गरबडे (बहुजन समाज पक्ष), सुनिल नेहरुलाल चौधरी (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये संतोष रावसाहेब दानवे (भाजप) व चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष लढणार

$
0
0

संकल्प मेळाव्यात लातूर ग्रामीणचे रमेश कराड यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मी काय चुकलो! हा प्रश्न गेल्या दोन दिवसांपासून स्वत:ला विचारतोय्... मला सहा महिन्यांपासून सांगता तुम्हाला निवडणूक लढवायची आहे. तुमची काही अडचण नाही असे सांगितल्याने मी उमेदवारी अर्ज भरला, त्यानंतर काय झाले हेच मला अजून कळाले नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष वाढविला, हे माझे चुकले काय? भाजप नेतृत्वाने पक्ष का विकला? असा जळजळीत सवाल करून लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे या माझ्या नेत्याने शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. त्यांचा मी कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यकर्त्यांना पक्षाने वाऱ्यावर सोडले, पण मी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. गेल्या चार दिवसांपासून असंख्य कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविलीच पाहिजे, अशी गळ घातल्याने कार्यकर्त्यांच्या या आग्रहास्तव अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची, घोषणा लातूर ग्रामीणचे नेते रमेश कराड यांनी संकल्प मेळाव्यात केली.

भाजपा-सेनेच्या वाटाघाटीत ऐनवेळी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ कसलीच ताकत नसताना शिवसेनेला सोडण्यात आला. या निर्णयामुळे भाजपा कार्यकर्त्यांत संतापाची लाट पसरली आहे. भाजपच्या विविध लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे पक्षश्रेष्ठीकडे बुधवारीच पाठवून दिले. जागावाटपाचा फेरविचार करुन पुन्हा लातूर ग्रामीणची जागा भाजपकडेच घ्यावी अशी मागणी केली. दरम्यान लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी संकल्प मेळावा आयोजित केला होता. यावेळी रमेश कराड बोलत होते.

या मेळाव्यास लातूरचे उपमहापौर देविदास काळे, प्रदिप पाटील-खंडापूरकर, रेणापूरचे सभापती अनिल भिसे, रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, रेणापूर तालुकाध्यक्ष ॲड. दशरथ सरवदे, संगायोचे लातूर तालुकाध्यक्ष साहेबराव मुळे, रेणापूर तालुकाध्यक्ष श्रीकिसन जाधव, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गंगासिंह कदम, जिपचे सदस्य सुरेश लहाने, यांच्यासह विविध संस्थेतील लोकप्रतिनीधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणे - मटा भूमीका

$
0
0

प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न व्हावे…

एमआयडीसीतील कारखान्यांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे खाड्यांमधील पाणी प्रदूषित होऊ लागले असून या पाण्यावरील प्रक्रियाही थांबली आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक एमआयडीसींमध्ये असे गंभीर प्रश्न आजही उद्भवत आहेत. सीईटीपी प्रकल्प उभारण्याची औपचारिकता दाखवली जात असली तरी त्याचा प्रभावी वापर केला जात नाही. त्यामुळे प्रदूषित पाणी थेट जलस्रोतांमध्ये जाऊन जलप्रदूषणाची तीव्रता वाढते. तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाची दखल घेऊन राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकरणी एमआयडीसीला ५ कोटींचा दंड ठोठावला. परंतु दंड भरूनही निसर्गाची आणि जलस्त्रोतांची झालेली हानी भरून निघणार कशी? त्यामुळे दंडात्मक कारवाईसोबतच एमआयडीसीनेही असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही आक्रमकपणे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कृती दलाची स्थापना झाली असून त्यामाध्यमातून या सर्व प्रकारांवर गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंब्रा-कळव्यात सेनेचा उमदेवार ठरेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

उमदेवार अर्ज भरण्याचा आज, शुक्रवार अखेरचा दिवस असताना मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेनेचा उमदेवार अद्याप निश्चित झालेला नाही. या मतदारसंघातील उमदेवारी रखडण्यामागे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील घोळ कारणीभूत असून तो कधी संपणार, असा प्रश्न शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पडला आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचारामध्ये आघाडी घेतली. दुसरीकडे आव्हाड यांच्या विरोधात कोणाला उमदेवारी द्यायची याच कोड्यामध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेतेमंडळी अडकल्याचे समजते.

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. २००९ आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आव्हाड मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले होते. मागील निवडणुकीमध्ये आव्हाड १ लाख १८ हजार ५३३ मते मिळवत विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात विजय मिळवणे अन्य पक्षातील उमेदवारांना खूपच अवघड असल्याचे चित्र आहे. २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचे दशरथ पाटील यांना ३८ हजार ८५० आणि भाजपचे अशोक भोईर यांना १२ हजार ८१८ मिळाली होती. या सर्व आकडेवारीवरून या मतदारसंघात राष्ट्रवादीचे चांगलेच प्राबल्य आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये युतीच्या जागावाटपामध्ये मुंब्रा-कळवा मतदारसंघ शिवसेनेला गेला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेकडून राजेंद्र साप्ते, सुधीर भगत, प्रदीप जंगम इच्छुक आहेत. त्यांनी मुलाखतीही दिल्या आहेत. मात्र, शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. उमदेवारी अर्ज भरण्याची शुक्रवारची अंतिम मुदत आहे. तरीही उमेदवार जाहीर न केल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

कल्याण ग्रामीणच्या उमदेवारीवरून मुंब्रा-कळवा मतदार संघातील शिवसेने उमेदवाराची घोषणा रखडल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे कल्याण ग्रामीणमधील विद्यमान आमदार सुभाष भोईर यांनी एबी फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, कल्याण ग्रामीणमध्ये रमेश म्हात्रे इच्छुक आहे. म्हात्रे यांना कल्याण ग्रामीण आणि भोईर यांना मुंब्रा-कळवा मतदारसंघातून उमेदवारी देण्याविषयी हालचाली सुरू आहेत. मात्र, भोईर यांनी मुंब्रा-कळवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दर्शवला असल्याने शिवसेनेपुढे मोठा पेच आहे. त्यामुळे मुंब्रा-कळवा मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘युद्धपातळीवर खड्डे बुजवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

संततधार पावसाने उसंती घेतल्यानंतर ठाणे शहरातील रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केले आहे. गुरुवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले.

आयुक्तांनी पातलीपाडा, आनंदनगर बस डेपो, होरायझन शाळा, लालानी रेसिडेन्सी, ब्रह्मांड, एअर फोर्स स्टेशन, कोलशेत, ढोकाळी नाका मुलुंड चेक नाका आणि इतर ठिकाणी रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. तसेच कामाची गती व दर्जा या विषयी अभियंत्यांना सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी ब्रह्मांड ते गायमुख या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडची पाहणी करून सर्व खड्डे बुजवण्याचे तसेच दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करण्याचे आदेश नगर अभियंता रवींद्र खडताळे यांना दिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येत असलेल्या उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करून महामंडळाचे उपअभियंता अनिरूद्ध बोराडे यांनाही उड्डाण पुलावरील खड्डे तत्काळ भरण्याच्या सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 44332 articles
Browse latest View live


Latest Images